पुणे : वडिलांनी केलेल्या चुकीची मुलीला जबरी शिक्षा देण्यात आली. वडिलांनी घेतलेले पैसे परत केले नाहीत म्हणून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला १० ते १५ दिवस लॉजमधील रुममध्ये डांबून ठेवले. एवढेच नव्हे तर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका दाम्पत्यावर पोक्सो व पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी पती फरार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
हा प्रकार ऑक्टोबर २०२३ ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत पीडित मुलीच्या घरी, के. के. मार्केट, धनकवडी येथे घडला आहे. याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने बुधवारी (ता. १४) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन पुनम आकाश माने (वय-२२) हिला अटक केली आहे. तर आकाश सुरेश माने (वय-२४, रा. शंकराच्या मंदिराजवळ, कात्रज गावठाण, कात्रज, पुणे) याच्यावर पोक्सो व पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आरोपींकडून आजारपणावर उपचारासाठी ३० हजार रुपये उसने घेतले होते. मात्र, त्यांना काही कारणास्तव पैसे परत करता आले नाहीत. त्यामुळे आरोपींनी फिर्यादी मुलीला जबरदस्तीने पळवून नेत के. के. मार्केट येथील एका लॉजमध्ये १० ते १५ दिवस डांबून ठेवले. ‘माझे पैसे दे, नाही दिले तर कुठुनही वसुल करुन दे, तुला सोडणार नाही’ अशी दमदाटी केली. आरोपी आकाश माने याने तिच्याशी दोन वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत ग्राहकांकडून पैसे घेऊन मुलीला देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील करीत आहेत.