पुणे : पुरोगामी महाराष्ट्रातील सुसंस्कृत शहर अशी ओळख मिरवणाऱ्या पुणे जिल्ह्यात आजही स्मशानभूमीत अघोरी पूजा होत आहेत. अवघ्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा केली होती. हडपसरमधील ससाणेनगर परिसरात पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखून तब्बल १८ लाखांना गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा एकदा पुण्याजवळील सोरतापवाडी गावातील स्मशानभूमीत चक्क मित्राच्या मृत्यूसाठी अघोरी पूजा करण्यात आली. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, व्यावसायिक वादातून मित्राचा मृत्यू होण्यासाठी पुण्यातील सोरतापवाडीजवळ स्मशानभूमीत गुरूवारी (ता. ७) रात्री अघोरी पूजा घातली. गणेश चौधरी हा अवैध सावकार आहे. पुण्याजवळील सोरतापवाडीमध्ये राहणारा त्याचा मित्र अमोल मानमोडे याचा मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबाचा सर्वनाश व्हावा म्हणून चौधरीने चक्क स्मशानभूमीत ही अघोरी पूजा घातली. एवढेच नव्हे तर त्याच्या कुटुंबाचा नाश व्हावा यासाठी त्याने चक्क मंत्राचे पठण देखील केले.
दरम्यान, या धक्कादायक घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनाही धक्का बसला. त्यानंतर गणेश चौधरी याच्या विरोधात मानमोडे यांनी पुण्यातील लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोरतापवाडीच्या स्मशानभूमीमध्ये चौधरी हा रात्री-अपरात्री जाऊन वेगवेगळ्या अघोरी पूजा घालत असल्याची माहिती यानिमित्ताने उघड झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
अघोरी प्रथांविरोधात कडक कायदे असतानादेखील कायद्याची भिती न बाळगता, विद्येच्या माहेरघरात असे अघोरी प्रकार सातत्याने उघडकीस येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.