भोर : स्मशानभूमीच्या जागेच्या वादातून जळत्या सरणावरुन वृद्ध महिलेचा मृतदेह स्मशानभूमीच्या आवारात फेकून दिल्याची खळबळजनक घटना बालवडी (ता. भोर) गावात रविवारी (ता. २४) रात्री घडली. रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने मृतदेहाची हेळसांड करणारा संशयित प्रकाश सदाशिव बढे (रा. नेरे) याला मारहाण करत त्याचे हॉटेल जाळून टाकले. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बालवडी गावात वृद्ध महिलेचे निधन झाले होते. त्यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर नातेवाईक घरी गेले. दरम्यान, वृद्ध महिलेचा मृतदेह जळत असतानाच प्रकाश बढे या संशयिताने मृतदेह बाहेर काढून फेकून देत मृतदेहाची विटंबना केली. हा प्रकार रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीने पहिल्याने उघडकीस आला.
दरम्यान, जळत्या मृतदेहाची विटंबना झाल्याची माहिती मिळताच, मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थांनी बढे यांच्या हॉटेलवर हल्ला केला. या हल्ल्यात हॉटेल पूर्णपणे जळून खाक झाले आहे. तर बढे यांना देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली आहे. मात्र, या घटनेत मृतदेहाची हेळसांड झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच, भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीप्ती तरटे, पोलीस हवालदार उद्धव गायकवाड, विकास लगस, केतन खांडे व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून ही तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी बढे यांना ताब्यात घेतले असून, उपचारासाठी भोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी आरोपी प्रकाश बढे याच्याविरोधात भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.