पुणे : कॉलेजमधील मुलींची छेडछाड, विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. पुण्यातील हडपसर भागात अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मांजरी येथील मुळा-मुठा नदी पात्रातील झाडीमध्ये नेऊन १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना हडपसर पोलिसांनी अटक केली.
अनुराग साळवे (वय २१ वर्ष, रा. आनंदनगर, केशवनगर, मुंढवा), गणेश अनिल म्हेत्रे (वय २३ वर्ष, रा. शिंदे वस्ती, मुंढवा) अशी आरोपींची नाव आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची मैत्रीण या दोघींना सोमवारी सायंकाळच्या सुमारास आरोपी अनुराग साळवे, गणेश अनिल म्हेत्रे हे दोघे मित्र म्हणाले की, आपण कुठे तरी फिरायला जाऊ. त्यानंतर चौघेजण मांजरी येथील नदीपात्रालगतच्या झाडीत गेले.
या वेळी आरोपी अनुराग साळवी आणि गणेश म्हेत्रे या दोघांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकाराबाबत पीडित मुलीने घरच्या मंडळींना सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार दिल्यानंतर दोन्ही आरोपींना अटक केली. आरोपी अनुराग साळवी आणि गणेश म्हेत्रे यांच्याकडे अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.