पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे परिसरातील एका सदनिकेत धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. वडील आणि मुलगा मृतावस्थेत सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. त्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अरुण पायगुडे (वय ६४) आणि ओंकार पायगुडे (वय ३२) अशी मृतावस्थेत सापडलेल्या पिता-पुत्रांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे परिसरातील व्हिजन इंग्लिश मिडीयम स्कूलजवळ एका सोसायटीत वडील आणि मुलगा मृतावस्थेत पडल्याची माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
मृत अरुण पायगुडे हे रेल्वेतून निवृत्त झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांना दोन मुले होती. पैकी एका मुलीचा विवाह झाला आहे. तर दोन वर्षांपूर्वी मुलगा ओंकारचा अपघात झाला होता. तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यामुळे तो घराबाहेर देखील येत नव्हता. पिता-पुत्रांना मद्य पिण्याचे व्यसन होते, अशी माहिती सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी दिली.
दरम्यान, पायगुडे यांच्या घरातील कचरा घेण्यासाठी सफाई कामगार गेला असता, दोघेही बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर त्याने शजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. त्यानंतर दोघांचेही मृतदेह गुरुवारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूमागचे निश्चित कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.