शिरुर : शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. करडे येथील माजी उपसरपंच आणि स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ यांनी दारुच्या नशेत शिरुर न्यायालयाच्या आवारात धिंगाणा घालत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मंगळवार (दि. १६) रोजी दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास घडला.अंकुश बांदल असं दारूचे सेवन करून धिंगाणा घातलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान, या प्रकारानंतर बांदल यांच्यावर गुन्हा दाखल करणे अपेक्षित असताना पोलिसांनी अजुनही त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे शिरुर पोलिसांवर कोणता राजकीय दबाव आहे का? अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये रंगू लागली आहे.
नेमकं काय घडलं?
करडे गावचे माजी उपसरपंच आणि स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ अंकुश बांदल यांनी शिरुर न्यायालयाच्या आवारात दारुच्या नशेत धिंगाणा घालून शिवीगाळ केली. यावेळी न्यायालयात उपस्थित असलेल्या काही वकिलांनी अंकुश बांदल यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांदल यांनी शिवीगाळ करणं सुरूच ठेवले. त्यानंतर न्यायालयातील एका न्यायाधिशांनी (नाव माहित नाही) कोर्ट पोलीस कर्मचाऱ्याला बांदल यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
मात्र, शिरुर पोलिसांनी बांदल यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही? अंकुश बांदल यांच्यावर यापूर्वीही शिरुर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील काही गुन्ह्यात बांदल जामीनावर सुटले आहेत. आता त्यांनी शिरुर न्यायालयाच्या आवारात शिवीगाळ करुनही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.