पुणे: शिवसेना नेते आणि माजी शिवाजी आढळराव पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला आहे. आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार, अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती, त्याला आज पूर्णविराम मिळाला. आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार, हे निश्चित आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात आढळराव पाटील अशी लढत आता होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला होता.
यावेळी बोलताना आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना संसदरत्न पुरस्कारांच्या विश्वासर्हतेवरच शंका उपस्थित केली आहे. त्यांनी म्हटले की, संसदरत्न पुरस्कार मलाही दोनवेळा मिळाला आहे. पण मी तो तिसऱ्यांदा घेतला नाही. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, यावरुन तुम्हीच ओळखा हा संसदरत्न पुरस्कार काय आहे? अमोल कोल्हे हे संसदरत्न पुरस्कार घेऊन स्वतःला मिरवत आहेत, अशी खरमरीत टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.
यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर चांगलीच टीकेची झोड उठवली. मला भाषण करताना फेकाफेकी करता येत नाही. मी हाडाचा राजकारणी नसून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी मला नाही. माझा राजकीय प्रवास आणि इतिहास सर्वांना माहित आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी पराभव केल्यानंतर ही विकास कामे करत राहिलो, असे आढळराव पाटील यांनी म्हटले.