केडगाव : दौंड तालुक्यातील भैरवनाथ विद्यालयातील शिक्षकांचे काम कौतुकास्पद असल्याने या विद्यालयाचा परिसरात नावलौकिक आहे, असे मत माजी आमदार रमेश थोरात यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या शालेय व गुणवत्ता संवर्धन अभियानात खुटबाव विद्यालयाचा प्रथम क्रमांक, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात दुसरा क्रमांक आणि शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान थोरात यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब ढमढेरे, सचिव सूर्यकांत खैरे, संचालक अरुण थोरात, मनोज थोरात, योगेश थोरात आणि प्राचार्य राजेंद्र जगताप यांच्यसह सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
थोरात पुढे म्हणाले, एकजुटीने कोणतेही काम केल्यास ते तडीस जाते. येथील शिक्षकांनी चांगले काम केल्याने विविध शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. विद्यालयाने आजपर्यंत केलेल्या कामाचे त्यांनी मोठ्या मनाने कौतुक केले आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शासनाच्या एनएमएमएस परीक्षेच्या राज्य गुणवत्ता यादीत रिया विशाल महामुनी या विद्यार्थिनीला ओबीसी प्रवर्गात प्रतिवर्षी 12000 प्रमाणे चार वर्षात 48000 रुपये मिळणार आहेत. शिवाय तनिष्का शेलार, गायत्री नातू, धनश्री रणदिवे, श्रमिका दोरगे, दिप्ती रणदिवे, अनिशा ढमढेरे, ऋतुजा राक्षे यांनी यश मिळवले. या सर्व विद्यार्थ्यांना उपशिक्षक हनुमंत थोरात, संतोष थोरात, राणी मांढरे, मनीषा निंबाळकर, वीणा ताडगे यांनी मार्गदर्शन केले.