पिंपरी: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर भाजपला गळती लागली आहे. चिंचवड विधानसभेतील भाजपचे माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कस्पटे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीत २०१७ मध्ये भाजपचे चार सदस्यांचे पॅनल विजयी झाले होते. त्यामध्ये कस्पटे विजयी झाले होते. त्यांच्याच पॅनलमधील तुषार कामठे यांनी पक्षातील एकाधिकारशाहीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कस्पटे यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीपासून शहरात भाजपला गळती लागली आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत आणखी काही नगरसेवक पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे माझा राजीनामा पाठविला आहे. शहराध्यक्षांच्या कारभाराला वैतागून मी राजीनामा देत असल्याचे त्यात म्हटले आहे. अशा प्रकारे राजीनामा देणार असल्याचे आम्ही वारंवार नेत्यांना सांगितले होते. पण, त्यांनी गांभीर्याने घेतले नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शहराध्यक्षांवर लावले आरोप
शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चिंचवड विधानसभेत पक्षात लोकशाही नसून घराणेशाही आहे. या घराणेशाहीला व हुकुमशाहीला अनेक माजी नगरसेवक वैतागले आहेत. आमचं कोणी ऐकणारच नसेल, तर दुसरा पर्याय दिसत नाही, असे कस्पटे यांनी या पत्रात म्हटले आहे.