पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट व अजित पवार गट यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले असतानाच, त्याचे पडसाद आता पवार कुटुंबातील वैयक्तिक संबंधांमध्येही दिसत असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या मल्टिस्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजन सोहळ्याला आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे आभार मानले. आमच्या पक्षात सत्तेचं विकेंद्रीकरण आहे. शरद पवार जयंत पाटील यांनी दादांच्या कामात ढवळढवळ केली नाही. हे आज अजितदादांच्या बोलण्याने स्पष्ट झाले. अजितदादांचे मी आभार मानते की, त्यांनी हे आज स्पष्ट केले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुणे जिल्ह्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती आणि हीच तर पवार साहेबांची खासियत आहे. या भागातील निर्णय प्रक्रियेत पवार साहेब आणि जयंत पाटील यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही. हे दादांनी आज स्पष्ट केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. त्यांना किती फ्री हॅण्ड मिळाला होता, हे आज स्पष्ट झाले आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, या पूर्ण कार्यक्रमात त्यांचा अजित पवारांशी कोणताही संवाद झाला नाही. यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दोघांनी जाणून-बुजून एकमेकांशी संवाद टाळल्याचं बोललं जात आहे. सुप्रिया सुळेंनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना यावर स्पष्टीकरण दिले आहे. “मला अजितदादांशी बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यांना जायची घाई होती. ते आलेही उशीरा आणि गेलेही लवकर. मी तर आधीच वेळेवर येऊन बसले होते. मी आले आणि माझ्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस आले. त्यामुळे त्यांच्याशी गप्पागोष्टी करण्याची संधी मिळाली. त्यानंतर अजित पवार उशीरा आले. नंतर त्यांनाच पुढच्या कार्यक्रमाला जायला उशीर झाला होता. घाईगडबड असू शकते. बिझी लोक आहेत”, अशी सूचक टिप्पणी सुप्रिया सुळेंनी यावेळी केली.
काही दिवसांपूर्वीच बारामतीमध्ये झालेल्या नमो रोजगार मेळाव्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत सुप्रिया सुळे व अजित पवार एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र, त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी दोघांचा संवाद होत असताना त्यांनी एकमेकांशी संवाद करणं टाळल्याचं दिसून आलं. त्यावरूनही तेव्हा राजकीय चर्चा घडून आल्याचं पाहायला मिळालं.
आजच्या कार्यक्रमाचे श्रेय कुणाचेही नाही. आरोग्याच्या कामाचं काय श्रेय घ्यायचं? माझी उमेदवारी जाहीर केल्याबद्दल महाविकास आघाडीचे आभार व्यक्त करते. जागा वाटपाबद्दल मला माहिती नाही. वरिष्ठ लवकर ठरवतील. लोकशाहीमध्ये सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांच्या काँग्रेसवरील टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिले. दहा वर्षे ट्रेलरला लागतो का? आणि पिक्चर फक्त ५ वर्षे…, म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला.