पुणे : लोकसभेची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक आणि खासगी सोसायट्या, गृहसंकुलांच्या भिंतीवर कमळ हे पक्षचिन्ह आणि निवडणूक घोषवाक्य रंगविण्याचा आदेश शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यानुसार भिंती रंगविण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र, निवडणुकीपूर्वीची ही रंगरंगोटी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपतर्फे ग्रामीण भागासाठी ‘गाव चलो अभियान’, तर शहरी भागासाठी ‘बूथ चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये सार्वजनिक आणि खासगी सोसायट्या, गृहसंकुलांच्या भिंतीवर कमळ हे पक्षचिन्ह, निवडणूक घोषवाक्य रंगविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार शहराच्या भिंतींवर रंगरंगोटी सुरू झाली आहे.
भिंतींची रंगरंगोटी ही भाजपच्या ‘बूथ चलो’ अभियानाचा हा एक भाग असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र, हे रंगकाम वादात सापडण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी भिंतींवर ‘कमळा’चे चिन्ह आणि निवडणुकीच्या घोषणांच्या जाहिराती रंगविण्यात येत असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षांकडून भाजपवर होत आहे. यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये वाढ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी बूथ चलो अभियान हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमाचा भिंती रंगविणे हा एक भाग आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार खासगी जागांवर घोषणा, भाजपचे पक्षचिन्ह रंगविण्यात येत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील पदाधिकाऱ्यांना तशी सूचना करण्यात आली आहे, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले. मात्र, याचे परिणाम आगामी काळात काय होणार, हे लवकरच दिसणार आहेत.