पुणे : “पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे माये सांगताहे” अर्थात कावळ्याची काव काव शकुन आहे. असे ज्ञानेश्वर माउलींनी सांगीतले आहे. हिंदू संस्कृतीत एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर पिंडाला शिवून मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कावळ्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांच्या नैवेद्यासाठी तेवढ्यापुरतेच कावळ्यांचे स्मरण होत आहे. परंतु मानवी स्वार्थामुळे व बदलत्या वातावरणामुळे कावळ्यांच्या संख्येत मोठी घट होत आहे. पितृपक्षात कावळा मिळणे कठीण झाले आहे.
सद्यःस्थितीत पर्यावरणाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम कावळ्यांवर झाला असून, कावळा आता ग्रामीण भागातही दिसेनासा झाला आहे. त्यामुळे काव… काव, अशी साद घालूनही न फिरवणारा कावळा दुर्मिळ झाला आहे. पितृपंधरवड्यात पूर्वजांचे श्राद्ध घातले जाते. श्राद्ध भाद्रपद शुक्ल पौर्णिमा ते आश्विन कृष्ण अमावास्या या पंधरवड्यात केले जाते. हिंदू संस्कृतीत प्रत्येक घटकाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. प्रत्येक सणावारात निसर्गाला प्राधान्य दिले आहे. मात्र, वाढत्या निसर्गाच्या हानीमुळे दिवसेंदिवस कावळ्यांची संख्या घटत आहे. त्यामुळे पिंडदान करणाऱ्यांना तासन्तास कावळ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.
एकेकाळी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कावळ्यांचे वास्तव्य असायचे. मात्र, ग्रामीण भागातही कावळे दिसेनासे झाले आहेत. परिणामी, अगदी सहजासहजी ऐकू येणारी कावळ्यांची काव… काव आता लुप्त झाली आहे. त्यामुळे पितृपंधरवड्यात पिंडदान करणाऱ्यांना कावळा दुर्मिळ बनला आहे. पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. हा वाढलेला वापर काही प्रजातीच्या मुळावर आला आहे. त्या पक्ष्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच आधुनिकीकरण वाढत असताना अनेक ठिकाणी वृक्ष तोड केली जात आहे अशा अनेक गोष्टी या पक्षांच्या जाती नष्ट होण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यासाठि वृक्ष लागवड करणे ही एक सामाजिक बांधिलकी असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.
सध्या शेतीसाठी कीटकनाशकाचा वापर वाढला आहे. परिणामी, कावळ्यांना सहजासहजी अन्न मिळणे अवघड झाले. शिवाय झाडांची संख्या कमी झाल्याने त्यांना घरटे करण्यास जागा राहिली नाही. यात प्रदूषण वाढले आहे. या सर्वांचा परिणाम कावळ्यांच्या संख्येवर झाला आहे.
हरिभाऊ सावंत, पक्षी प्रेमी (देलवडी)