पुणे : पुणे पोलीस दलातील अमलदार नितीन शिंदे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. मैत्रीच्या नात्यातील ओलावा जपण्यासाठी २००७ च्या पोलीस बॅचमधील प्रत्येकाने १ हजार रुपयांपासून १० हजारांपर्यंत असे मिळून तब्बल ११ लाख रुपये गोळा केले. तसेच एकत्रित सर्व रक्कम दिवगंत नितीन यांच्या मुलींच्या नावे बँकेत फिक्स डिपॉजिट (एफडी) केली जाणार आहे.
पुणे पोलीस दलातील अमलदार नितीन दिलीप शिंदे भरोसा सेलमध्ये कार्यरत होते. ३१ जानेवारीला सोलापूरहून पुण्याला येत असताना खासगी आरामदायी बसचा अपघात झाला. त्यामध्ये नितीन यांचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर २००७ पोलिस बॅचमधील त्यांच्या मित्राने नितीनच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचा निश्चय केला.
त्यानंतर मित्रांनी गोळा केलेले ११ लाख रूपये दिवंगत नितीनच्या मुलींच्या नावे करण्यात येणार आहे. बँकेत फिक्स डिपॉजिट केल्यानंतर दर महिन्याला व्याज मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही मुलींचा शैक्षणिक खर्च भागण्यास मदत होणार आहे. त्यादृष्टीने पोस्ट कार्यालय किंवा सरकारी बँकेत ही रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. अशी माहिती पैसे जमा करणार्या मित्रांनी दिली आहे.