शिक्रापूर : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाने गाडी थांबविण्याचा इशारा केला. तरी देखील भरधाव वेगाने थार कार पोलिसाच्या अंगावर घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याप्रकरणी पोलिस शिपाई ज्ञानदेव बाळासाहेब सोनवणे (वय-५१ वर्षे रा. स्वामी समर्थ नगर, साठे वस्ती. लोहगाव पुणे.) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून किरण जालिंदर बवले (वय-२७ वर्षे रा. वडगाव घेनंद ता. खेड जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात पोलिस शिपाई ज्ञानदेव सोनवणे वाहतूक नियमनाचे काम करत होते. त्यावेळी पुणे बाजूने विरुद्ध दिशेने एक काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेट असलेली थार कार आली. पोलिसांनी त्या कार चालकाला थांबण्याच्या इशारा केला. मात्र, त्या कार चालकाने भरधाव वेगाने कार सोनवणे यांच्या अंगावर घातली. त्यावेळी सोनवणे प्रसंगावधान राखून मागे सरकल्यामुळे मोठं अनर्थ टळला.
दरम्यान, कारचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तेव्हा कार चालकाने थारची काच खाली घेऊन पुढे आलात तर जीवे मारून टाकीन अशी पोलिसांना धमकी दिली. शेजारील स्थानिकांनी व पोलिसांनी कार चालकाला थांबवत त्याच्या जवळील एम. एच. १४ एल.ए. ३१३१ ही थार कार ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विजय मस्कर करीत आहेत.