पुणे : हिंजवडी येथील इमारतीच्या बांधकामासाठी पर्यावरण विषयक परवानगी देण्यासाठी ७ लाख ७० हजार डॉलर्स अर्थात भारतीय चलनातील साडे ४ कोटीची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार तब्बल १० वर्षानंतर उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमेरिकन कंपनी, उपकंपनी व तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांवर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉग्नीझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन इंडीया प्रा लि. चे तत्कालीन अधिकारी, श्रीमनिकंदन राममुर्ती (तत्कालीन उप संचालक, कॉग्नीझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन इंडीया प्रा लि), लार्सन अॅन्ड टुब्रो चे तत्कालीन अधिकारी, तत्कालीन विविध शासकिय विभागाचे अनोळखी अधिकारी व इतर अनोळखी खाजगी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ७३ वर्षीय पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कॉग्नीझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन कार्पोरेशन अमेरिका या कंपनीची उप कंपनी आहे. कॉग्नीझंट इंडिया लिमिटेड या कंपनीने मद्रास, तामीळनाडू, पुणे, महाराष्ट्र सह भारतात अनेक ठिकाणी प्रोजेक्ट तरू केले आहेत.
या कंपनीने पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी व्यावसायिक इमारतीचे बांधकाम सन २०१२ मध्ये सुरू केले होते. व्यावसायिक इमारतीचे बांधकाम करण्यासाठी त्यांनी एल अँड टी या कंपनीस कंत्राट दिले होते. कॉग्निझंट इंडियाचे, हिंजवडी पुणे येथील प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकामाची जबाबदारी कॉग्निझंट कंपनीचे श्रीमनिकंदन राममुर्ती यांच्यावर होती.
श्रीमनीकंदन राममुर्ती व एल अॅन्ड टी या कंपनीने कॉग्निझंट इंडिया टेक्नॉलॉजी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांनी हिंजवडी येथील इमारतीचे बांधकामाचे संदर्भात पर्यावरण विषयक परवानगी मिळवताना, तेथील अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून परवानगी मिळविल्या. त्यासाठी त्यांनी ७ लाख ७० हजार अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनातील अंदाजे ४ कोटी ५० लाख रुपये इतकी लाच अनोळखी अधिका-यांना दिली.
याबाबत ७३ वर्षीय यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गन्हा दाखल होण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाला या तक्रारीमध्ये प्रथमदर्शनी तथ्य आढळून आले. त्यानंतर पुणे विशेष न्यायालय तथा सत्र न्यायाधीश यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहेत.
दरम्यान, याप्रकरणी ७३ वर्षीय तक्रारदार यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात अमेरिकन कंपनी, उपकंपनी व तत्कालीन शासकीय अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागा पोलीस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर करीत आहेत.