लोणी काळभोर, ता. 25 : गुणवत्ता संवर्धन अभियानात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील इंग्लिश मिडीयम स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने हवेली तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे शाळेचे सर्वत्र भरभरून कौतुक होत आहे.
पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता संवर्धन शाळा तपासणी अभियान 2024-25 राबविण्यात आले होते. हे अभियान शालेय विकासातील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शालेय स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तर या तीन टप्प्यांमध्ये हे अभियान राबविण्यात आले होते. या अभियानात जिल्ह्यासह हवेली तालुक्यातील शाळांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या अभियानात इंग्लिश मिडीयम स्कूलने हवेली तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.
पुणे येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे या अभियानाचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवारी (ता.24) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पार पडला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्याहस्ते मुख्याध्यापिका पौर्णिमा शेवाळे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, विश्वस्त अरुण थोरात, कार्यकारिणी सुरेश कांचन व इंग्लिश मिडीयम स्कूलचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, या गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळेतील भौतिक सुविधा, प्रशासन विषयक, अध्ययन अध्यापन प्रक्रिया, मुख्याध्यापक कर्तव्ये, शालेय विभाग, गुणवत्ता संवर्धन व विशेष उपक्रम या 6 विभागाअंतर्गत पाहणी करून गुण देऊन अभिप्राय नोंदविण्यात आला. या गुणदानांतर्गत इंग्लिश मिडीयम स्कूलने गुणवत्ता संवर्धन अभियानात शाळेने तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला आहे.