पुणे : विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या संकल्पना समजाव्यात म्हणून अभियांत्रिकी व वैद्यकीय शिक्षण आता मातृभाषेतून देण्यात येणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सीतारामन बोलत होत्या.
पुढे बोलताना म्हणाल्या, गेल्या दहा वर्षांत प्रोफेशनल मानव्यशाखेच्या शिक्षणाच्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच आयआयटी, ऑल इंडिया मेडिकल इन्स्टिट्यूट, विद्यापीठे आणि कॉलेज यांच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सीट्सची संख्याही वाढवली आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रात चांगले डॉक्टर, नर्सेस यांच्या सीट्स वाढवल्या आहेत. आधीच्या सरकारने शिक्षणाबाबत काही ठोस पावले उचलली नाहीत, अशी टीका निर्मला सीतारामन यांनी केली.
तेलंगणा व इतर राज्यांतून काही विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी चीन, बिजिंग येथे जातात व तेथे भारतीय वैद्यकीय शिक्षण संस्थांच्या समकक्ष मान्यता नसणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतात. मला माहीत आहे. हैदराबाद येथील विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. तेथून शिक्षण घेऊन आल्यावर त्यांना कळते की त्यांची डिग्री गुणवत्तापूर्ण संस्थेची नसून त्यावेळी त्यांना भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी येथील परीक्षा द्यावी लागते. याचबरोबर बरेच विद्यार्थी उझबेकिस्तान, युक्रेन येथेही जातात. परंतु त्यांनाही तोच नियम असल्याचे निर्मला सीतारामन यांनी यावेळी स्पष्ट केले.