भिगवण : अतिक्रमणाने वेढलेल्या व पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या मदनवाडी तलावाची पाहणी करावी. तसेच, तलावातील अतिक्रमणधाराकांवर कारवाई करून कार्य स्थळाचा नकाशासह परिपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी इंदापूरच्या खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभागच्या उपविभागीय अभियंता यांना देण्यात आले आहे.
या आदेशाने अतिक्रण धारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. वर्षानुवर्षे होत असलेल्या या अतिक्रमानाने तलावाचा श्वास कोंडू लागला होता. पाटबंधारे खात्याने संबंधित अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्याने या गोष्टींना चाप बसणार असल्याचेही सिद्धेश्वर निंबोडीचे सरपंच संतोष सोनवणे यांनी सांगितले. संबंधित खात्याने आदेश दिला असला तरी त्याची तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे ही नागरिकांनी सांगितले.