पुणे : आजकाल महिला घरात, घराबाहेर आणि ऑफिस कामाच्या ठिकाणी ही सुरक्षित नसल्याचे समोर येत आहे. आपल्या आजुबाजूला असे बरेच प्रकार घडत असलेले समोर येत आहे. अशातच खासगी वित्तीय संस्थेत काम करणाऱ्या एका तरुणीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी व्यवस्थापक शुभम दुबे (वय 34) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम दुबे हा एका प्रसिद्ध खासगी वित्तीय संस्थेत व्यवस्थापक आहे. येरवडा भागातील आयटी पार्क परिसरात त्यांच्या कंपनीचे कार्यालय आहे. तिथे तरुणी वित्तीय संस्थेत कर्मचारी आहे. तरुणी प्रसाधनगृहात जाताना आरोपी शुभम दुबे तिचा पाठलाग करायचा. प्रसाधनगृहाजवळ त्याने तरुणीला अडवून असभ्य वर्तन केले. त्याने तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. मागणी पूर्ण न केल्यास कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली. त्यावेळी तरुणीने त्याला नकार दिला. त्यानंतर व्यवस्थापक शुभम दुबे तरुणीला वारंवार त्रास देत होता. त्याच्या त्रासामुळे तरुणीने वित्तीय संस्थेतील महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार दिली. परंतु समितीने त्या महिलेच्या तक्रारीची दखल घेतली नाही. तसेच कंपनीकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर आरोपी शुभम दुबेने तरुणीला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली, असे तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. अखेर तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर याप्रकरणी येरवडा पोलिसांनी व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका देवकर-पाटील करत आहेत.