पुणे : पालकांनी होस्टेलसाठी भरलेले पैसे कॉलेजच्या बँक खात्यात जमा न करता, तब्बल ३ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी कॉलेजच्या कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे देणार नाही काय करायचे ते करा, मी घाबरत नाही कोणाला, असे म्हणून बघून घेतो अशी धमकीही या कर्मचाऱ्याने दिली. मावळ तालुक्यातील वराळे येथील डी.वाय. पाटील कॉलेज येथे ऑगस्ट २०२३ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत हा प्रकार घडला.
याबाबत डॉ. सुशांत विजयकुमार पाटील (वय-४१, रा. सुप्रीम पाम, बालेवाडी, पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन तुषार सुंदरबापु क्षीरसागर (रा. वराळे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार हा वराळे येथील डी. वाय. पाटील एम.बी.ए. कॉलेज येथे काम करतो. आरोपीने कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या व ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांचे पैसे कॉलेजच्या बँक खात्यात न भरता त्याचा परस्पर अपहार केला.
तुषार याने क्यूआर कोडचा वापर करून त्याद्वारे स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर केले. याबाबत विचारणा केली असता अरेरावीची भाषा करत पैसे देणार नाही काय करायचे ते करा, मी घाबरत नाही कोणाला, असे म्हणून बघून घेतो अशी धमकी दिली. आरोपीने हॉस्टेल व्यवस्थापन व विद्यार्थ्यांच्या पालकांची २ लाख ९७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.
या घटनेचा पुढील तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत.