वाघोली : वाडेबोल्हाई येथील सराफ व्यावसायिकाने नवीन सोन्याच्या बांगड्या बनविण्यासाठी ग्राहकाकडून जुन्या पाच तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या घेतल्या. नव्या बांगड्या लवकरच करून देण्याचे आश्वासन देवून, सोन्याचे दागिने व रोख रक्कमेचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सराफ व्यावसायिकावर लोणीकंद पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितीन सुभाष क्षिरसागर, ( रा. शिवरकर वस्ती, वाघोली, मुळ रा. कुरंदा, ता. वसमत, जि. हिंगोली ) असे सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. महालक्ष्मी ज्वेलर्स नावाने तो व्यवसाय करीत होता. या प्रकरणी अमोल कुंडलीक पायगुडे (वय ३२, रा. पायगुडेवस्ती, वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल व त्यांची आई मालन यांनी नवीन सोन्याच्या बांगड्या बनविण्यासाठी जुन्या पाच तोळे वजनाच्या बांगड्या क्षिरसागर यांना दिल्या. नवीन बांगड्या बनवून देतो असे त्याने सांगितले. बरेच दिवस होवूनही बांगड्या न मिळाल्याने पायगुडे हे दुकानात गेले. मात्र दुकान बंद होते. त्यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सरफाने मोबाईल उचलला नाही. सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने व पैशाचे अपहरण झाल्याचे लक्षात आल्यानंतर पायगुडे यांनी पोलीसात तक्रार दिली.
दरम्यान, याच सराफाने अन्य ग्राहकांच्या पैशांचा अपहार केल्याचेही क्षिरसागर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.