पुणे : पुण्यामध्ये एमपीएससीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून रात्रभर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन करत होते. काल रात्री आठ वाजता सुरू करण्यात आलेले आंदोलन रात्रभरही सुरूच होतं. रात्री आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या ही वाढतच गेली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून रात्री आंदोलकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षेची 25 तारीख पुढे ढकण्याच्या मागणीवर ठाम आहेत.एमपीएससीने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात 258 कृषी पदांचा समावेश करावा, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे त्यामुळे एका परीक्षेला विद्यार्थ्यांना मुकावं लागणार आहे. त्यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
मध्यरात्री पोलिसांचा बंदोबस्त..
रात्रीच्या सव्वा एक वाजता पुण्यातील शास्त्री रोडवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पुणे सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा हे एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या शास्त्री रस्त्यावर गेले. त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु, विद्यार्थी आंदोलन मागे न घेण्यावर ठाम आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मोठा पोलीस बंदोबस्त शास्त्री रस्त्यावर तैनात करण्यात आला आहे.
एमपीएससी आयोगाचे रात्री सव्वा वाजता ट्वीट..
एमपीएससी आयोगाने रात्री सव्वा एक वाजता ट्वीट केलं. त्यामध्ये महाराष्ट्र कृषी सेवा संवर्गातील मागणी पत्राच्या अनुषंगाने गट अ आणि गट ब ची जाहिरात दोन दिवसात प्रसिद्ध करणार असल्याचं आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. या संवर्गातील पूर्व परीक्षाचे आयोजन ऑक्टोबरमध्ये करण्यात येईल. मात्र 25 तारखेला परीक्षा होणार असल्याचे आयोगाने आता जवळपास स्पष्ट केलं आहे.
रस्यावर ठिय्या आंदोलन..
काल रात्री (दि. २०) 8 वाजता नवी पेठेतील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलक एमपीएससी उमेदवार जमायला सुरुवात झाली होती. रात्री 9 वाजता नवी पेठेतील लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील ICICI बँकेसमोर आंदोलन सुरू झालं. यावेळी पोलीस पथक तिथे दाखल झाले. रात्री 11 वाजता एमपीएससी आंदोलकांची गर्दी वाढत गेली होती. रस्यावर ठिय्या आंदोलन सुरु होऊन घोषणाबाजी सुरू झाली. रात्री साडे 11 वाजता शास्त्री रस्ता वाहतूकीसाठी दोन्ही बाजूंनी बंद झाला होता.
रात्री 12 वाजता पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आंदोलनस्थळी पोहचले. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी एकत्र आंदोलनाचा आढावा घेतला. रात्री एक वाजता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आंदोलकांना घरी जाण्याची विनंती करण्यात आली. परंतु रात्री दोन वाजता एमपीएससी उमेदवार आंदोलनावर ठाम राहत त्यांच्याकडून घोषणाबाजी सुरुच होती.