लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुळशी भरारी पथकाने कोरेगाव मूळ व पेठ (ता. हवेली) येथे छापे टाकून तब्बल २० लाखांच्या व्यावसायिक व घरगुती वीजचोरीचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये कोरेगाव मूळ येथील प्रसिद्ध हॉटेल देशमुखवावाड्याच्या मालकासह पेठ येथील दोन सख्ख्या भावांनी वीजचोरी केल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी विशाल बाळकृष्णा कोष्टी (वय ४४, फ्लॅट नं. १०१, साईचेवग सोसायटी, वडगांव शेरी, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल देशमुखवाड्याचे जागा मालक धनंजय सुरेश शितोळे (कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे), रामचंद्र भिकू चौधरी व अर्जुन भिकू चौधरी (दोघेही रा. पेठ, ता. हवेली) यांच्याविरोधात भारतीय विद्युत कायद्यानुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल कोष्टी हे महावितरणचे उप कार्यकारी अभियंता आहेत. ते मुळशी विभागाच्या भरारी पथकात कार्यरत आहेत. वीज ग्राहकांच्या विद्युत संचाची तपासणी करून वीजचोरी आढळून आल्यास विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करणे, असे कोष्टी यांच्या कामाचे स्वरूप आहे.
पहिल्या घटनेत कोरेगाव मूळ येथील हॉटेल देशमुखवाड्याच्या विद्युत संचाची तपासणी केली असता, धनंजय शितोळे यांनी हॉटेलच्या शेड शेजारील लोखंडी पोलवरून अनधिकृतपणे वीजपुरवठा सुरू असल्याचे दिसून आले. शितोळे यांनी मागील चार वर्षांपासून ७०२९३ युनिटची वीजचोरी केली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे १४ लाख ५७ हजार ३३० रुपयांचे
आर्थिक नुकसान झाले आहे.
दुसऱ्या घटनेत, महावितरणच्या भरारी पथकाने पेठ येथे छापा टाकला असता, रामचंद्र चौधरी व अर्जुन चौधरी यांनी घरगुती मीटरच्या इनकमिंग टर्मिनलमध्ये इनकमिंग व आऊटगोईंग या दोन्ही वायर एकत्र जोडून अनधिकृतपणे घरामध्ये वीज पुरवठा सुरु केल्याचे दिसून आले. शिवाय मीटरच्या दोन्ही बाजूला मीटरच्या कंपनीचे सील असलेल्या ठिकाणी बारीक छिद्रे आढळून आली. या दोघांनी मागील सहा वर्षांपासून २२,९०६ युनिटची वीजचोरी केली आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचे ५ लाख १ हजार ३६० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, महावितरणच्या मुळशी भरारी पथकाने कोरेगाव मूळ व पेठ येथे छापे टाकून, तब्बल २० लाखांची विद्युत चोरी उघडकीस आणली आहे. ही वीजचोरी उघडकीस आणल्याने वीजचोरी माफियांचे धाबे दणाणले आहेत. ही कामगिरी महावितरणचे उप कार्यकारी अभियंता विशाल कोष्टी व वरिष्ठ तंत्रज्ञ शुकलाल जाधव यांच्या पथकाने केली. तर वीज चोऱ्यांमुळे अतिरिक्त विजेचा भार आमच्यावर येत असल्याने, अधिक कडक कारवाई करावी व ही कारवाई अशीच चालू राहावी, अशी वीज ग्राहकांची मागणी आहे.