लोणी काळभोर, ता. 20 : मार्च महिन्यात महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी साम, दाम, दंड व भेद ही अस्त्रे वापरून ग्राहकांकडून पठाणी वसुली केली आहे. मात्र महावितरण नागरिकांना विद्युत पुरवठा सुरळीत देण्यास अपयशी ठरली आहे. कारण ऐन उन्हाळ्यात कदमवाकवस्ती (ता. हवेली) परिसरातील घोरपडे वस्तीत विजेच्या लपंडावाचा खेळखंडोबा सुरु आहे. मागील दोन महिन्यांपासून रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. त्यामुळे महावितरणाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील घोरपडी वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महावितरणचा एक डी पी आहे. या डीपीवरील एक दीवा नेहमीच जात असतो. त्यामुळे घोरपडे वस्तीत नेहमी वीज जात आहे. त्यामुळे नागरिकांना तासनतास अंधारात बसावे लागत आहे. तर काही भागात नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
घोरपडे वस्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर विजेचा लपंडाव सुरू असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने कित्येक नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. दैनंदिन जीवनशैलीवर याचा परिणाम होत आहे. रात्री-अपरात्री वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या नागरिकांच्या पाचवीलाच पुजली आहे. या भागात डासांचा प्रादूर्भाव असल्याने रात्रीची झोप उडाली आहे. दैनंदिन दिनचर्येवर याचा परिमाण झाला आहे.
दरम्यान, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी प्रत्येक गुरुवारी पूर्व हवेलीतील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. तरी देखील अनियमित वीजपुरवठ्यामुळे अनेकांना विजेच्या उपकरणांचा आधार घ्यावा लागत आहे. तर वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन देखील भरमसाठ देयके येत असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.
विद्युत उपकरणे नादुरूस्त
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. त्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न, भाज्या, दूध खराब होत असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे. पंखा बंद झाल्यावर लहान मुलाला डासांपासून वाचविण्यासाठी कपड्याने हवा घालावी लागत आहे. लाईट येण्याची वाट पहावी लागत आहे. वायरमन या भागाकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे संबंधित वायरमनवर महावितरण प्रशासनाने कारवाई करावी.
– पल्लवी गायकवाड, कदमवाकवस्ती, ता. हवेली