पुणे : उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार यांनी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. मागील दोन वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला या निवडणुका कधी होणार, असा प्रश्न पडला आहे.
लोकसभा निवडणूक भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र लढवली होती. या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्र लढतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. असं असताना अजित पवार यांनी विधानसभा आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.
पुण्यातील मेळाव्यात बोलताना अजित पवार म्हणाले कि, केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केलं आहे. तसेच आपण आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणून लढणार आहोत, पण त्यानंतर होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली आहे.