Election पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज शुक्रवारी (ता.२८) दुपारपर्यंत पर्यंत ३३.०९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली आहे.
निवडणूक तब्बल २० वर्षानंतर..!
हवेली बाजार समितीची निवडणूक तब्बल २० वर्षानंतर लागल्याने ती अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठेची मानली जात आहे. यामध्ये सेवा सहकारी सोसायटी ,ग्रामपंचायत, आडते -व्यापारी , हमाल मापारी या चार गटातील उमेदवार रिंगणात आहेत. त्या त्या विभागातील मतदार यांना बाहेर काढून मतदान करण्यासाठी चुरस लागली आहे.
या निवडणुकीत सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार या दोन पॅनलमध्ये लढत होत आहे. व्यापारी आडते मतदार संघातून २ जागेसाठी सर्वाधिक मतदार आहेत . यामध्ये १२ उमेदवार रिंगणात उतरवले असून जय शारदा गणेश पॅनल व जनशक्ती पॅनल व व्यापारी विकास पॅनल यामध्ये खरी लढत आहे. तर हमाल मापाडी या संघातून एक जागेसाठी ५ जण रिंगणात आहेत.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी शुक्रवारी सकाळ पासून मतदान सुरू आहे. या १८ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ४ मतदान केंद्र असून, ३१ मतदान बुथवर १७ हजार ७४६ मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.
दरम्यान, सकाळपासून बूथ केंद्रांवर गर्दी सुरू आहे. यामध्ये मतदार पेक्षा , राजकीय मंडळी ,सामाजिक संस्था संघटनेचे नेते तसेच मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.