राहुलकुमार अवचट
यवत : शिवसेनेच्या बेलसर-माळशिरस जिल्हा परिषद गट प्रमुखपदी माळशिरसचे माजी उपसरपंच तसेच राष्ट्रतेज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र भुलाजी गद्रे यांची निवड करण्यात आली. सासवड येथे झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना नेते तथा माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम व शिवसेना उपनेते तथा माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते राजेंद्र गद्रे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या वेळी शिवसेना नेत्या तथा विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे, शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या ज्योती वाघमारे, जिल्हा प्रमुख दिलीप यादव, तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, युवा सेना तालुकाप्रमुख अॅड. नितीन कुंजीर, उपजिल्हाप्रमुख रमेश इंगळे, युवा सेना तालुका समन्वयक गणेश मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र गद्रे यांनी माळशिरस गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि उपसरपंच म्हणून काम करत असताना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांसह अनेक विकासकामे तसेच गरजू लाभार्थींना विविध योजनांचे लाभ मिळवून दिले आहेत. राष्ट्रतेज प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते माळशिरस आणि पंचक्रोशीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतात.
शिवसेना उपनेते आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलसर-माळशिरस गटात शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे या वेळी राजेंद्र गद्रे यांनी सांगितले.