पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या होणाऱ्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांची नामनिर्देशित सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषद सदस्यांची मुदत संपल्याने सध्या पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासकराज सुरू आहे. पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवरही प्रशासकराज सुरू असल्याने जिल्हा नियोजन समिती पालकमंत्री म्हणून अजित पवार हे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तर राज्य शासनाने आधीची समिती बरखास्त केली असल्याने समितीच्या अधिनियमानुसार जिल्ह्यातून निवडून आलेल्या आमदार किंवा खासदार यांना सदस्य म्हणून नामनिर्देशक करण्यात येते.

नामनिर्देशित सदस्यांपैकी पैकी फक्त दोन सदस्य निवडता येतात त्यानुसार राज्य सरकारने बुधवारी दि. 29 रोजी दौंड भाजपाचे आमदार राहुल कुल व मावळ चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नेमणूक केली आहे. पुणे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठे घवघवीत यश मिळाले होते यामध्ये 21 पैकी 18 आमदार हे महायुतीची निवडून आले आहेत. यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी कोणाची वर्णी लागणार यामध्ये मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती.

तसेच पुणे जिल्ह्यात भाजपचे अनेक मात्तबर नेते निवडून आले असून यामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ,आमदार महेश लांडगे, असे अनेक मात्तबर खासदार, आमदार असता देखील दौंडचे आमदार राहुल कुल यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी वर्णी लावत आमदार राहुल कुल यांना बळ देत पुणे जिल्ह्याचा दादा ‘अजितदादा’ नंतर दुसरे दादा हे राहुलदादा आहेत, हे दाखवून दिले आहे.








