उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापुर महामार्गावर सर्वात मोठ्या व व्यापारीदृष्ट्रया संवेदनशिल समजल्या जाणाऱ्या उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अमित उर्फ बाबा भाऊसाहेब कांचन यांची निवड झाली आहे. सतरा सदस्य असलेल्या उरुळी कांचन ग्रांमपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत 17 पैकी 9 मते मिळवून अमित उर्फ बाबा कांचन हे सरपंचपदी विराजमान झाले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात आज (बुधवारी) सरपंचपदाची निवडणुक पार पडली.
उरुळी कांचनचे मावळते सरपंच भाऊसाहेब लक्ष्मण कांचन यांनी कांही दिवसापुर्वी ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने, वरील निवडणूक घेण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी नूरजहा सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीत सरपंच पदासाठी निर्धारीत वेळेत मिलींद जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा संपूर्ण गावात रंगू लागली होती. याच वेळी अमित कांचन यांनी शेवटच्या दहा मिनिटात अर्ज दाखल केल्याने, उरुळी कांचनच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.
दरम्यान सरपंचपदासाठी बाबा कांचन व मिलींद जगताप या दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी नूरजहा सय्यद यांनी निवडणुकीची घोषणा केली. प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत अमित उर्फ बाबा कांचन यांना 9 तर मिलिंद जगताप यांना 6 मते पडली. तर एक मत बाद झाले. यामुळे अमित कांचन यांची सरपंचपदी निवड झाल्याची घोषणा नूरजहा सय्यद यांनी केली. यावेळी तलाठी सुधीर जायभाय, कर्मचारी रामलिंग भोसले, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, कर्मचारी सोमनाथ बगाडे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन, मावळते सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, सुभाष बगाडे, आदित्य कांचन, योगेश कांचन, भाऊसाहेब कांचन, महात्मा गांधी तरुण मंडळाचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.