पुणे : आगामी निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने विविध माध्यमांतून मतदार यादी शुद्धीकरणासाठी कार्यवाही सुरू केलेली आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यात दुबार नाव नोंदणीचे 28 हजार, तर समान छायाचित्रांचे 1 लाख 42 हजार 349 मतदार आढळले आहेत. याबाबत संबंधितांनी दुरुस्ती करून घेण्यासाठी आयोगाने एकापेक्षा अधिक ठिकाणी समान फोटो, एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आणि दुबार नाव नोंदणी आढळलेल्या मतदारांना ‘नमूना अ’मध्ये नोटीस पाठविल्या आहेत.
भारतीय लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 17 व 18 नुसार एका मतदाराची मतदार यादीमध्ये एकच नोंद असणे, निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी मतदार यादी त्रुटीरहीत असणे आवश्यक आहे. मात्र, काही मतदारांचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी नोंद असल्याचे आढळले असून संबंधित मतदारांना दुरुस्ती करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीवरील पर्याय निवडून 1 जानेवारी 2024 पर्यंत दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन पुणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.
आयोगाने पाठवलेल्या या नोटिशीद्वारे कोणत्या एका ठिकाणी नाव अपेक्षित आहे, हे ठरविण्याचा अधिकार मतदाराला देण्यात आला आहे. संबंधित मतदाराने ज्या ठिकाणी त्याचे नाव असणे त्यांना स्वतःला अभिप्रेत आहे, त्या ठिकाणी बरोबरची खूण करावी आणि दिलेल्या ईमेल ऍड्रेसवर आधारकार्डच्या छायाप्रतीसह अपलोड करावे किंवा संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत पुष्टीकरण पत्रावर कार्यवाही करणे आवश्यक आहे. या मोहिमेनंतर दोन ठिकाणी जर मतदाराचे नाव आढळले, तर निवडणूक आयोगाच्या सुचनेप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असेही डॉ. राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले.