पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहित लागू होण्यापूर्वी सनदी अधिकारी आणि राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक बदल्या करताना केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम आणि निकष पूर्ण न केल्याच्या तक्रारी होत आहेत. याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच बदली झालेल्या अनेक अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला जोरदार दणका देत 109 अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द केल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करताना नियम, निकषांचे पालन न केल्याने अनेक अधिकारी मॅटमध्ये गेले होते. याबाबत मॅटने केंद्रीय निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या अनुषंगाने बदली करतानाचे नियम, निकष तपासून पाहण्याची विनंती केली होती. अशी एकूण २२५ प्रकरणे आयोगाकडे दाखल झाली होती. या प्रकरणांची छाननी केल्यानंतर 109 बदल्या नियम, निकषानुसार झाल्या नसल्याचे निदर्शनास आले. ही बाब मॅट आणि राज्य शासनाला कळविण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणांत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी लागणार आहे.’