निरगुडसर : रांजणी-वळती रस्त्यावर वाळूंज मळा येथे भरधाव वेगात आलेली एसटी बस रस्त्यावरील खड्डयात आदळली आणि चालकाचे नियंत्रण सुटून बसने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या वृद्ध महिलेला चिरडले. बुधवारी (ता. १३) सकाळी ही घटना घडली.
या अपघातात वच्छला किसन भोर (वय ६२) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर एसटीमधील प्रवासी जखमी झाले. अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वळती (ता. आंबेगाव) येथील वाळुंजमळा येथून सकाळी ९.३५ वाजणयाच्या सुमारास ही बस नारायणगावहून शिंगवेकडे जात होती. या वेळी रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमध्ये बस जोरात आदळली आणि एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले. याच दरम्यान वच्छला किसन भोर (वय ६२ ) या महिला रस्त्याच्या कडेने भोकरवस्तीकडे पायी जात होत्या. बसने महिलेला धडक दिली.
भरधाव वेगात आलेल्या बस अपघातात महिला एसटीच्या पुढच्या भागात अडकल्याने जागेवरच मृत्युमुखी पडली. क्रेनच्या सहाय्याने एसटी बाजूला करून मृत्युमुखी पडलेल्या महिलेला काढण्यात आले. अपघात इतका भयंकर होता की, महिलेचा एक पाय तुटून बाजूला पडला होता.
अपघातादरम्यान गेनभाऊ विठ्ठल वाळुंज यांची क्रुझर जीप त्यांच्या शेडमध्ये उभी होती. बस जीपवर आदळून सखाराम बबन वाळुंज यांच्या घरावर धडकून थांबली. या घटनेत जीपचे व घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी पोलीस प्रशासन व एसटी महामंडळ तब्बल एक तासाने आले. एसटीमधील प्रवासी देखील जखमी झाले असून, जखमी प्रवाशांना मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच खासगी दवाखान्यात उपचारासाठी पाठवण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम, शरद बँकेचे संचालक शिवाजीराव लोंढे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर, खरेदी-विक्री संघाचे संचालक बाळासाहेब बोऱ्हाडे, सरपंच आनंद वाव्हळ, उपसरपंच तेजस भोर यांनी घटनास्थळी भेट दिली.