पिंपरी-चिंचवड : सध्या आपल्या आसपास अनेक माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असतात. माणुसकीच्याच नाही तर रक्ताच्या नात्यांनाही काळीमा फासणाऱ्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना मुळशी येथून समोर आली आहे. बंगल्याचे तोडफोड करू नको असे सांगितल्याचा राग आल्याने मुलाने आपल्या 67 वर्षीय आईला मारहाण केली आहे.
8 जून 2024 रोजी जांभे, मुळशी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात आईने फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी मुलगा संतोष साहेबराव मांदळे (वय 43, रा. मुळशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेसंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांचा मोठा मुलगा आहे. आई वरच्या बंगल्यावर राहते. तिथे काम करत असताना मुलाने बंगल्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आईने मुलाला तोडफोड करू नको असे सांगितले. याचा राग आल्याने मुलाने आईला शिवीगाळ करत मारहाण केली.
या मारहाणीमध्ये आईच्या उजव्या हाताला व पायाला फ्रॅक्चर झाले आहे. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात मुलाविरोधात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.