पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. बालेबाडी क्रिडा संकुलात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
तूम्ही संसार चालवताना कसरत करता, तसेच सरकार चालवताना देखील कसरत करावी लागते. कमिटेड खर्च करावाच लागतो. पण लाडक्या बहिणींना द्यायचे होते. म्हणून निर्णय घेतला. विरोधक म्हणतात लाडक्या भावांचे काय? त्यांना कधी प्रेम होते का भावांबद्दल? मग सोडून गेले असते का? आज मिळालेल्या लाखो भगिनी उर्जा देणाऱ्या आहेत. या शक्तीच्या जोरावरच सर्वांना पुरून उरलो आहे. सावत्र भावांवर मात करून आलो आहे. मनाची नाही तर जनाची तरी ठेवा. खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना जोडा दाखवा, नाद सगळ्याचा करा, पण आमचा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी बजावले.
कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, विसरू नका : अजित पवार
पुढची ५ वर्षे योजना सुरू ठेवायची तर आगामी निवडणूकीत कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, विसरू नका असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. यामध्ये कसलेही राजकारण नाही, खरे तेच बोलतो. विरोधक कारण नसताना टीका करतात. कोणीही पैसे परत घेणार नाहीत. या पैशांचा चांगला विनियोग करा. भावांनाही वीज माफी केली. दुधाचा दर वाढवून दिला. तरीही टीका होते. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. आम्ही कामाची माणसे आहोत आजपर्यंतच्या राजकीय जीवनातील हा सर्वात मोठा दिवस आहे असे अजित पवार म्हणाले.
हे देना सरकार, लेना सरकार नाही : देवेंद्र फडणवीस
हे देना सरकार आहे, लेना सरकार नाही. मागचे सरकार वसुली सरकार होते. आम्ही देणारे आहोत. तूमच्या सावत्र भावांना योजना होऊ द्यायची नव्हती. पण काही झाले नाही. पूर्वीच्या योजना दलालीच्या होत्या. मोदींमुळे आधार, बँक खाते, पैसे जमा, असा त्रिशूळ तयार झाला आहे. आई आणि बहिणीचे प्रेम कशानेही विकत घेता येत नाही, हे विरोधकांना कळत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.