पुणे : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगानं याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे यापुढे एकनाथ शिंदे यांचीच शिवेसना असणार आहे.
पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. पक्षचिन्हासोबतच शिवसेना नावदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळाले आहे. यापूर्वी निवडणूक आयोगानं हंगामी निर्णय देताना दोन्ही गटांना वेगवेगळे चिन्ह दिले होते. तसेच दोन्हीपैकी एकाही गटाला शिवसेना हे नाव दिले नव्हते.
दरम्यान, शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव तर ठाकरेंच्या गटाला शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिले होते. मात्र अंतिम निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात आपला निर्णय टाकून त्यांना शिवसेना हे नाव दिले आहे.
शिंदेंना धनुष्यबाण म्हणजे वारेमाप खोक्यांचा वापर : संजय राऊत..!
ज्या पद्धतीने खोक्यांचा वारेमाप वापर झाला. तोच खोक्यांचा वापर लक्षात घेता हा तोच विजय आहे. खोक्यांचा वापर कुठपर्यंत झाला हे आता स्पष्ट झालं आहे. हा खोक्यांचा विजय आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाचा निर्णय धक्कादायक : सुप्रिया सुळे..!
कुणावर विश्वास ठेवायचा हे कळत नाहीये. निवडणूक आयोग हे खूप पारदर्शक आहे. हा निर्णय मला कळतच नाहीये. हा निर्णय कसा झाला. या शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. बाळासाहेब हयात असताना त्यांनी ठरवलं होतं की, बाळासाहेबांनंतर शिवसेना ही उद्धव ठाकरे बघतील, पण हा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.