पिंपरी : ‘हमारा भाई जेल से छुट गाय, अभी हम दुश्मन को देख लेंगे’ असे म्हणत टोळक्याने सशस्त्र दुचाकी रॅली काढत दहशत पसरवली. या प्रकरणी शनिवारी (दि.४) पिंपरी पोलीस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ८ जणांना अटक केली आहे.
आकाश गणपत चव्हाण (वय २७), आकाश उर्फ काकडी सुरेश दांगडे (वय २७), करण उर्फ छोटू अनिल धोत्रे (वय २२), राहुल उर्फ काळ्या नागनाथ कुऱ्हाडे (वय २५), सतीश उर्फ बांगो बाळू दांगडे (वय २८), ऋषिकेश गेमू राठोड (वय २३), महेश उर्फ मामू राजू विटकर (वय २३), अक्षय नेताजी, मोरे (वय २८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह आकाश मंगळू राठोड (वय २८), उमेश धर्मा राठोड (वय २८), राजेश भगवान पवार (वय २९), महेश मलकाप्पा पुजारी (वय २८), तुषार बाळू मांजाळकर (वय ३०, सर्व रा. इंदिरानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार आनंद बजबळकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास इंदिरानगर चिंचवड येथे घडली.
आरोपींनी दुचाकीवरून रॅली काढली. हातात लाठ्या, काठ्या व कोयते घेऊन रॅली काढत दुचाकींचे हॉर्न मोठमोठ्याने वाजवून लोकांना शिवीगाळ करून रस्त्याच्ये बाजूला होण्यास दमदाटी केली. हातातील काठ्या व कोयते हवेत फिरवून आरोपींनी परिसरात दहशत निर्माण केली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ आठ जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.