उरुळी कांचन : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत पार्क केलेल्या तीन ट्रकमधून सुमारे आठशे लिटर इंधन चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील नायगाव फाटा येथील परफेक्ट वे वजन काट्याजवळ गुरुवारी (ता.८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी अक्षय कदम (वय 23, रा. बीटी कवडी रोड, पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलसांनी तीन ते चार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय कदम हे एक ट्रान्सपोर्ट व्यवसायिक आहेत. कदम यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक नेहमीप्रमाणे नायगाव फाटा येथील परफेक्ट वे वजन काट्याजवळ पार्क केला. बुधवारी (ता.७) रात्री अकरा ते गुरुवारी (ता.८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन ट्रकच्या टाक्या उचकटून सुमारे ८१० लिटर इंधन चोरी केले.
दरम्यान, अक्षय कदम यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, त्यांना एका स्कॉर्पिओ गाडीतून तीन ते चार अज्ञात चोरटे त्यांच्या ट्रक आल्याचे दिसून आले. चोरटे ट्रकच्या टाक्या उचकटून त्यातून डीझेलची चोरी करताना आढळून आले. त्यानंतर चोरांनी डीझेलचे कॅन स्कॉर्पिओ गाडीत भरून पळ काढला.
याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी डीझेल चोरीचे फुटेज ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सचिन जगताप करत आहेत.