संतोष पवार
पुणे : ” राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही दर्जेदार ई साहित्य विकसित करण्यासाठी लाभदायक असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023 चा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
शालेय शिक्षण व साक्षरता विभागाच्या केंद्रीय सहसचिव अर्चना अवस्थी , राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक आर विमला, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, योजना कार्यालयाचे संचालक महेश पालकर, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे संचालक शरद गोसावी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक संपत सूर्यवंशी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे, परिषदेचे सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ. माधुरी सावरकर, ज्योती शिंदे आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.
श्री केसरकर पुढे म्हणाले की गुणवंत विद्यार्थी घडवणे हे शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तंत्रस्नेही शिक्षक हे काम प्रभावीपणे करू शकतात. तसेच अशा व्हिडिओ निर्मिती स्पर्धेद्वारे शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान सुधारण्यास मदत होणार आहे. तंत्रज्ञान युक्त अध्ययन अध्यापन प्रक्रिया वाढीस लागणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तमोत्तम व्हिडिओंचे संकलन करून त्याचा प्रत्येक शाळेमध्ये प्रसार व प्रचार केला पाहिजे. त्यातून शिक्षण प्रक्रिया ही प्रगल्भ होणार आहे.
सद्यस्थितीत व्यावसायिक शिक्षण व रोजगार निर्मिती करणारे शिक्षण हे आवश्यक आहे. यावेळी माझी शाळा व माझी परसबाग या उपक्रमातील विजेत्यांचेही कौतुक करण्यात आले. व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमधून राज्यस्तरावर विजयी झालेल्या 84 उमेदवारांचा यावेळी सत्कार कऱण्यात आला. माझी शाळा माझी परसबाग या उपक्रमात विजयी ठरलेल्या शाळांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परिषदेतील अधिव्याख्याता डॉ. नीता जाधव व डॉ. दिपाली जोगदंड यांनी केले. योजना कार्यालयाचे संचालक महेश पालकर यांनी आभार मानले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेसह शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सर्व विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी व प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी व्हिडिओ निर्मितीची स्पर्धेची अंमलबजावणी केली. शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई-साहित्य निर्मितीची चळवळ उभी रहावी; यासाठी राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक प्रशिक्षक यांच्यासाठी तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मितीची स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आली.