संतोष पवार
पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल शिक्षण विभागातील अधिकारीवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि गुणवंत पाल्यांचा पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर पतपेढीच्या वतीने केला जाणारा सन्मान हा निश्चितच प्रेरणादायी व स्तुत्य उपक्रम आहे असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह आणि पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर पतपेढीचे कार्याध्यक्ष शिवाजीराव खांडेकर यांनी व्यक्त केले. पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर पतपेढीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
पतपेढीच्या वतीने आयोजित शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार समारंभ रविवार दिनांक २८ जुलै रोजी पुणे येथील राष्ट्रसेवा दलाच्या निळू फुले सभागृह, साने गुरुजी स्मारक येथे संपन्न झाला. यावेळी पुणे शहर वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक अधिक्षक संजय गंभीरे यांना शैक्षणिक सेवा पुरस्कार, जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी तथा कै.का.रा. वैशंपायन पुरस्कार ज्ञानदा माध्यमिक विद्यालय जुन्नर येथील संजय बाठे यांना, कै.रा.ब. पाटणकर पुरस्कार तृप्ती आढाव (ब.रा.अग्रवाल हायस्कूल), संगीता नरुटे (मॉर्डन हायस्कूल) ज्ञानेश्वर गोळे (कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल), दादा सावंत (महात्मा फुले हायस्कूल पिसोळी) यांना प्रदान करण्यात आला.
त्याचबरोबर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या इयत्ता दहावी बारावी पदवी व पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत पाल्यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर पतपेढीचे असणारे आदर्श कामकाज, आर्थिक प्रगतीचा, पतपेढीचा पुणे शहराबरोबरच जिल्हयात होत असणारा विस्तार आदिं कामांबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी पुणे मनपा माजी नगरसेवक तथा स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, शिक्षणतज्ञ व मुंबई राष्ट्रवादी शिक्षक सेल अध्यक्ष बोधी पोळ-दारस्तेकर, राज्य शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, शिक्षकेत्तर महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर, वेतन पथक अधीक्षक संजय गंभीरे, पतपेढीचे संचालक मंडळ, जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते.