संतोष पवार
पळसदेव : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापनानिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करण्याचे आदेश शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत. शिक्षण सप्ताहाच्या आठवड्यातील प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजीत केला असून त्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलुंचा समावेश करण्यात आला आहे.
सदरचा शिक्षण सप्ताह हा विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते व भागधारक यांच्यात सहकार्य वाढवणारा ठरणार आहे. शिक्षण सप्ताहामध्ये अध्ययन व अध्यापन साहित्य, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, क्रीडा, सांस्कृतिक, कौशल्य डिजिटल उपक्रम मिशन लाइफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब उपक्रम, शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग आदि प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिलेल्या आहेत.
सदरच्या शिक्षण सप्ताह दरम्यान आयोजित उपक्रमांची छायाचित्रे व माहिती राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी विकसित केलेल्या प्रणालीमध्ये वेळोवेळी न चुकता अपलोड करण्यात यावीत असेही निर्देश देण्यात आले आहेत. सप्ताहातील आयोजित उपक्रमांसाठी आणि विषयांकरिता नोडल अधिकारी म्हणून प्राथमिक शिक्षण संचालक, एससीईआरटी संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक ,बालभारती संचालक, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अध्यक्ष, योजना शिक्षण संचालक आदि अधिकाऱ्यांची समन्वयक – नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.