लोणी काळभोर : कोणत्याही राष्ट्राचे भविष्य हे शैक्षणिक विचारांवर अवलंबून असते. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विचारांची प्रक्रिया शिक्षणातून उभी रहात असते. प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीमागे एक शिक्षक असतो. त्यामुळे शिक्षकांनी आपली कर्तव्ये जपली पाहिजेत. महाराष्ट्राला वैचारिक वळण देण्याचे काम शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी केले आहे. बापूजींचा विचार शिक्षकांनी अध्यापनात उतरवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, वाबळेवाडीचे जनक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे (जालिंदरनगर, ता. खेड) मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी केले.
शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या १०६ व्या जयंती प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून “नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षकांची भूमिका” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे हे होते. यावेळी उपाध्यक्ष नामदेवराव कांबळे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ आर. व्ही. शेजवळ, सहसचिव (अर्थ) एस. एम. गवळी, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, प्राचार्य डॉ मिलिंद हुजरे, प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना दत्तात्रय वारे म्हणाले कि, नवीन शैक्षणिक धोरणाची योग्य अंमलबजावणी केल्यास कौशल्याधारित विद्यार्थी घडविता येतो. नवीन शैक्षणिक धोरणात सर्वांना शिक्षण, कौशल्याधारित शिक्षण, गुणवत्तापूर्ण, परवडणारे शिक्षण आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना या गोष्टी महत्वाच्या असतात. शिक्षकाने वेळापत्रकात न अडकता सदैव विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी तत्पर असायला हवे. स्वाभिमान हा माणसाला संघर्षातून व सत्कर्मातून मिळत असतो. मन, बुध्दी आणि शरीर एकत्र आल्याशिवाय प्रभावी शिक्षण होत नाही. शिक्षकांनी अध्यापनात प्रयोगशीलता जपली पाहिजे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारांचा वारसा मोठा आहे, असे दत्तात्रय वारे म्हणाले.
अभयकुमार साळुंखे म्हणाले की, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची उभारणी केली. शिक्षणातील संधी आणि आव्हाने ओळखून बापूजींनी कार्य केले. या शिक्षणयज्ञात बापूजींनी अव्याहतपणे कार्य केले. विद्यार्थ्याला घडविणे हे प्रत्येक शिक्षकाचे उद्दिष्टय असायला हवे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास कसा होईल यासाठी शिक्षकांनी सदैव तत्पर असले पाहिजे, असे प्रतिपादन साळुंखे यांनी केले.