पुणे : पुणे रेल्वे स्थानकाबाबत एक बातमी समोर आली आहे. पुणे विभागातील पुण्यासह १० रेल्वे स्थानकांना ‘ईट राइट स्टेशन’ मानांकन मिळाले आहे. अन्न तयार करण्यापासून ते प्रवाशांना खाण्यासाठी देण्यापर्यंतची प्रक्रिया योग्य पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण या स्थानकांतील सर्व खाद्य विक्रेत्यांना देण्यात आले आहे. याचबरोबर त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत चाचणी करून त्यांना हे मानांकन देण्यात आले आहे. यामुळे यापुढे रेल्वे प्रवाशांना स्वच्छ खाद्यपदार्थ खाण्यास मिळणार, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
ईट राइट इंडिया मोहीम..
भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नेतृत्वाखाली ‘ईट राइट इंडिया’ ही मोहीम राबविली जात असते. त्या मोहिमेअंतर्गत ‘ईट राइट स्टेशन’ हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत रेल्वे स्थानकावरील सर्व खाद्य विक्रेते, केटरिंग युनिट, रेस्टॉरंट, फूड कोर्ट तसेच लहान विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यात अन्न तयार करण्यापासून ते वाढण्यापर्यंत सुरक्षित स्वयंपाक आणि हाताळणी पद्धतींचे पालन करण्याचा समावेश केलेला असतो. अशा पद्धतीने प्रशिक्षण दिल्यानंतर सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून याचे पालन होते की नाही, याची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत केली जाते. या चाचणीच्या आधारे संबंधित स्थानकाला ‘ईट राइट स्टेशन’ मानांकन देण्यात येते.
पुणे विभागाअंतर्गत येणारे पुणे,दौंड, मिरज, सांगली, कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, कोपरगाव, साईनगर शिर्डी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांना हे मानांकन देण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने हा उपक्रम राबविला आहे. यासाठी मारिको इंडिया कंपनीकडून सामाजिक दायित्व निधी प्राप्त झाला होता. या उपक्रमासाठी समन्वय अधिकारी नारायण सरकटे यांनी काम पाहिले आहे. तसेच पुणे रेल्वे स्थानकातील केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी सुधीर कुमार यांनी सुद्धा विशेष प्रयत्न केले.