पुणे : आगामी लोकसभा निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. येत्या ५ आणि ६ तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. दरम्यान, निवडणुकीची रणनिती आखण्याची जोरदार तयारी सुरू असतानाच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढवली आहे. लोणावळ्यात अजित पवार गटात मोठी नाराजी असून, याच नाराजीतून तब्बल १३७ जणांनी राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लोणावळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक शहराध्यक्षासह १३७ जणांनी राजीनामा दिला आहे. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हस्तक्षेप केल्याने नाराजी व्यक्त करत सर्वांनी राजीनामा दिला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. विनोद होगले हे लोणावळा युवक शहराध्यक्ष म्हणून होते. आमदाराने परस्पर लोणावळा युवक शहराध्यक्ष पद दुसऱ्याला दिले आणि पक्ष संघटनेत डावलत असल्याचा आरोप करत महिला, युवती, तरुणांनी राजीनामा दिला आहे.
दरम्यान, राजीनामा दिलेल्या लोणावळ्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक शहराध्यक्षाची मावळमधील आणि पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजीनामा देण्याच्या निर्णयावर ते ठाम आहेत. “आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, आम्ही राजीनामा दिला आहे. २० ते २५ वर्षे झाली, पक्षाचे काम केले, आम्हाला डावलून इतरांना संधी का?”, असा सवाल सर्वांनी केला आहे.
लोणावळा युवक शहराध्यक्षपदी मंगेश मावकर यांना संधी देण्यात आली आहे. त्यांना काही अनुभव नाही असे असतानाही त्यांना संधी देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. “आम्ही राष्ट्रवादी पक्षासोबत होतो. आता मात्र आम्हाला निर्णय घ्यावा लागला. लवकरच पुढचे पाऊल उचलणार आहोत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार”, अशी प्रतिक्रिया राजीनामा देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे.