काटेवाडी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी नोंदणी, ‘ई-केवायसी’सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत राज्यात १५ जानेवारीपर्यंत गावपातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले.
‘पीएम किसान’ योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. या योजनेंतर्गत निश्चित उत्पन्न मिळवता येऊ शकते. यात नोंदणी केलेले लागवडीलायक क्षेत्रधारक, बँक खाती आधार संलग्न व योजनेचे ई-केवायसी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. पीएम किसान योजनेचा १६ वा हप्ता जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे.
ई-केवायसीसाठी नजीकच्या सामाईक सुविधा केंद्राशी आणि बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.