युनूस तांबोळी / लोणी काळभोर : काही ना काही कारणाने कुटूंबाची आर्थीक स्थिती डळमळीत झालेली असते. अशा कुटूंबातील महिलाच दुर्गेचे रूप घेऊन काबाडकष्ट करत आपल्या कुटूंबाला सावरण्यासाठी पुढे येतात. चंद्रमोळ्या झोपडीत आभाळ फाटाव अशी वेशभुषा असली तरी स्वाभीमानाने कष्ट करण्याची हिंमत त्यांच्या मनगटात असते.
वेळ प्रसंगी चार घरची धुनी भांडी करत भाकरीचा चंद्र शोधण्याचे काम लोणी काळभोर ( ता. हवेली ) येथील रेखा लक्ष्मण बोडके ही दुर्गा अविरत करत आहे. ‘प्रपंच जरी असला फाटका तरी करीन नेटका’ असे म्हणत जिद्दीने व चिकाटीने कुटूंबाला सावरण्याचे काम ती करत असल्याने समाजातून तिचे कौतूक केले जात आहे.
वडील विठ्ठल आई रतन राखपसरे या गरिब कुटूंबात रेखा चा जन्म झाला. घरात तीन मुलगे व एक मुलगी असा त्याचा परिवार होता. रेखा ही सगळ्यात लहान असून घरची गरीबीची परिस्थीती असल्याने तिचे पाचवी पर्यंतचे शिक्षण झाले. मांजरी फार्म येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर काही कारणास्तव तिला शाळा सोडून द्यावी लागली. येथूनच ती मोलकरीण म्हणून उदयास आली.
घरचे अठरा विश्व द्रारिद्य त्यामुळे नेहमीच आर्थीक चणचण भासत होती. एवढ्या लहान वयात आईला कामात मदत करायची. हिच जबाबदारी रेखावर आली होती. त्यामुळे आई बरोबर चार घरची धुनी भांडी करण्यातच तिच बालपण हरवून गेले. शिक्षणाची वाट चुकल्याने व मार्गदर्शन करणारा कोणी न मिळाल्याने आयुष्यात वाटेत मोलकरीण म्हणूनच तीने तारुण्यात पदार्पण केले.
मुलीचे लग्न ही आई वडीलांसाठी जबाबदारी या बरोबर अभीमानाची गोष्ट असते. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील लक्ष्मण बोडके यांच्याशी 2002 मध्ये विवाह झाला. सर्वसामान्य कुटूंब असल्याने येथेही कष्ट करण्याची जबाबदारीने तिची पाठ सोडली नाही. या ठिकाणी तीने कष्ट करत प्रंपच करण्याचे धाडस दाखवले. या दांपत्याला तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये झाली. तीनही मुली दहावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत आहे. मुलगा लोणी स्टेशन परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेत आहे.
रेखाचे पती लक्ष्मण बोडके हे मंडप बांधण्याचे काम करतात. हे काम हंगामी असल्याने घराचा आर्थिक गाडा व मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यामुळे रेखाने घराची जबाबदारी स्वीकारून चार घरची कामे करण्याकडे अधिक लक्ष दिले. ती चार घरी व 6 दुकानात मोलकरणीचे काम करीत आहे. यामधून त्यांना 15 हजार रुपये मिळत आहेत. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांची संसाराची आर्थिक घडी चांगली बसली असून मुलांचेही चांगले शिक्षण होऊ लागले आहे.
कष्ट आणि जिद्दीने कोणतेही काम केले तरी त्यात कोणताच कमीपणा नसतो. जबाबदारीने काम केले तर त्याला निश्चितच यशाची फळे योताना दिसतात. माझे शिक्षण झाले नसले तरी मुलींचे शिक्षण पुर्ण करण्याची माझी जिद्द आहे. मुलांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी बनविण्याचे स्वप्न मला पुर्ण करायचे आहे. त्यासाठी अजून चार घरची कामे मला करावी लागली तरी ती मी करेन. असे रेखाने अभीमानाने सांगत कष्ट करणाऱ्या हाताने तीने डबडबलेले डोळे पदराआड केले.