पुणे : साताऱ्यातील एका मेंदुमृत (ब्रेनडेड) व्यक्तीमुळे चौघांना जीवनदान मिळाले आहे. त्याच्या यकृताचे एका व्यक्तीला प्रत्यारोपण करण्यात आले. दोन मूत्रपिंडांचे दोघांना प्रत्यारोपण करण्यात आले. या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पुण्यातील तीन खासगी रुग्णालयात झाल्या. त्याचवेळी चेन्नईतील रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण करण्यात आले.
बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमध्ये साताऱ्यातील सुनील निगडे (वय ५५) उपचार घेत होते. यांना मेंदुमृत म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यावेळी प्रत्यारोपण समन्वयक रेश्मा कुलावडे यांनी रुग्णाच्या कुटुंबीयांचे अवयव दानाविषयी समुपदेशन केले. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेण्यासाठी खूप धाडस लागते. या कुटुंबाने ते करण्याचा निर्णय घेतला. या रुग्णाचे अवयव दान करून इतर लोकांना नवीन जीवन मिळणार असल्याने कुटुंबाकडून संमती देण्यात आली.
दरम्यान, कुटुंबाची संमती मिळाल्यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वयक केंद्राने तत्काळ अवयवांचे वाटप सुरू केले. हृदयासाठी राष्ट्रीय अवयव प्रत्यारोपण समितीला कळवण्यात आले. मेंदुमृत व्यक्तीचे एक मूत्रपिंड बाणेरमधील मणिपाल हॉस्पिटलमधील एका रुग्णाला देण्यात आले. दुसरे मूत्रपिंड पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आले. हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलमधील रुग्णाला यकृत देण्यात आले.
चेन्नईतील एमजीएम हॉस्पिटलमधील रुग्णाला हृदय पाठवण्यात आले. हृदयाचे हस्तांतरण करण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. मणिपाल हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद धारसकर आणि त्यांच्या पथकाने एका रुग्णावर मूत्रपिंड प्रत्यारोपण केले. तज्ज्ञ डॉ. तरुण जेलेका आणि त्यांच्या पथकाने या संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान मदत केली.
बाणेरच्या मणिपाल हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभाग प्रमुख डॉ. भूषण नगरकर यांनी याविषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मेंदुमृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी त्याचे हृदय, यकृत आणि दोन्ही मूत्रपिंडे दान करण्यास संमती दिली. या कुटुंबाने घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे गंभीर परिस्थितीतील चार रुग्णांचे प्राण वाचले.