पळसदेव (पुणे) : पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे उजनी पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त आहे. पुणे आणि धरणक्षेत्रातील पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग उजनीकडे येत आहे.
उन्हाळयातील तीव्र तापमान आणि वैशाख वणव्याच्या झळांनी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यासाठी दुष्काळ सदृश्य परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. तथापि जून महिन्यातील पडलेला पाऊस आणि आता जुलै महिन्यातील पडणाऱ्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीतील झालेल्या वाढीमुळे ऊस लागवडीच्या रखडलेल्या कामांना आता वेग येणार आहे.
गेल्या 54 दिवसातील नीचांकी पातळी असणारा उजनीतील मृत पाणीसाठा आता प्लसमध्ये येत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पुणे व धरणक्षेत्रातील परिसर, भीमा खोऱ्यातील सुरु असणारी पावसाची सततधार, खडकवासला, चासकमान, पवना, कासारसाई, वरसगाव, पानशेत आदि धरण ओव्हरलफूल झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा उजनीत विसर्ग सुरू आहे.
उजनी पाणलोट क्षेत्रातील असणाऱ्या ऊसाच्या पिकामुळे सहकारी साखर कारखानदारी व्यवसायाला अर्थकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्व आहे. पुणे धरणक्षेत्रातील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या करमाळा, इंदापूर, दौंड, माढा आदि तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेतीपंप सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची लगबग सुरू आहे. धरणक्षेत्रात पावसाचे प्रमाण लक्षात घेता आणि उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता अशीच जर परिस्थिती राहिली तर येत्या पाच सहा दिवसात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता नाकारता येत नाही.