पुणे : जिभेचे चोचले पुरविणारी ज्वारी व बाजरीच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहउद्योगांमध्ये तयार होणारी भाकरीही महागली आहे. एरवीच्या तुलनेत भाकरीमागे ५० पैसे ते एक रुपयापर्यंत वाढ झाली आहे. परिणामी, एक भाकरी ७ रुपये ५० पैसे ते ८ रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
भाकरीच्या दरात वाढ झाल्याने शहरातील बहुतांश हॉटेल व खानावळचालकांनी गृहउद्योगाकडून मागविण्यात येणार्या भाकर्यांची संख्याही कमी केल्याचे चित्र आहे. पुणे शहरात औद्योगिक वसाहती, व्यावसायिक संकुले, कामगार वसाहती, रेल्वे स्थानक परिसर आदी ठिकाणी अनेक लहान खानावळी आणि कॅण्टीन आहेत.
छोटेखानी हॉटेल, कॅण्टीन तसेच खानावळींना ज्वारी, बाजरी भाकरींची आवश्यकता भासते. त्या पार्श्वभूमीवर शहरातील गृहउद्योगांमार्फत ज्वारी, बाजरीची भाकरी तसेच चपाती पुरविण्याचे काम करण्यात येते. चपाती अथवा भाकरीसाठी स्वतंत्र व्यक्ती ठेवण्यापेक्षा गृहउद्योगांमार्फत चपाती व भाकरी घेण्यास चालक प्राधान्य देतात.
दरम्यान, वाढत्या महागाईमुळे भाकरीत झालेली वाढ ही ग्राहकांना परवडणारी नसल्याने त्यांनी भाकरीऐवजी आपला मोर्चा चपातीकडे वळविला आहे. सद्य:स्थितीत गहूही महागला आहे.
मात्र, ज्वारी व बाजरीच्या तुलनेत स्वस्त असल्याने छोटेखानी हॉटेल, कॅण्टीन तसेच खानावळचालकांनी चपातीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसून येत आहे.