पुणे : राज्यात दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता पुण्यात एक घटना घडली आहे. मात्र, महिलांनी ठाम भूमिका घेतल्यास अशा घटनांना आळा बसू शकतो, याचा प्रत्यय पुण्यात घडलेल्या घटनेतून आला आहे. बसमध्ये एका मद्यपी व्यक्तीने महिलेची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता महिलेने या मद्यपीला चांगलाच चोप दिला आहे. तसेच मद्यपी व्यक्तीस पोलीसांच्या ताब्यात दिल्याची घटना (दि.18) समोर आली.
शिर्डी येथील एका शाळेत क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षिका प्रिया लष्करे या त्यांच्या पती आणि मुलासोबत पुणे येथे बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान एका मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीने त्यांची छेड काढली. मात्र, घाबरुन न जाता प्रिया यांनी तात्काळ रुद्रावतार धारण करु त्या व्यक्तीला चांगलाच चोप दिला. यानंतर त्या व्यक्तीला थेट शनिवारवाड्याजवळील पोलीस चौकीत घेऊन गेल्या. मात्र, पोलीस चौकीत एकही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याचे लक्षात आले.
जवळपास अर्धा तास त्या व्यक्तीला चौकीतच डांबून ठेवत शिक्षिका यांनी माजी नगरसेवक अजय खेडेकर यांना संपर्क साधून घडलेला प्रकार कळवला. यानंतर काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, या संपूर्ण प्रकरणात एस बसमधील महिलांपैकी एकही महिला मदतीसाठी पुढे आली नाही. तर दुस-या बसमध्ये जाणे पसंत केले.याबाबत प्रिया लष्करे यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रिया लष्करे यांनी या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले, आधुनिक समाजात महिलांनी एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी एकजुटीची गरज आहे. जर महिलांनी एकमेकांसोबत एकजुट होऊन आवाज उठवला, तर या प्रकाराच्या घटनांना थांबवता येईल.”