पुणे : गेल्या काही दिवसांपासून शेवग्यांच्या भावात सातत्याने वाढ होत असून, रविवारी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात शेवग्यास प्रतिदहा किलोस २ हजार १०० रुपये ते ४ हजार रुपये इतका भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात शेवगा ५०० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.
रविवारी गुलटेकडी येथील मार्केटयार्डात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून अवघ्या दोन टेम्पो शेवग्याची आवक झाली, तसेच स्थानिक परिसरातून शेवग्याची आवक अत्यंत कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत ही आवक कमी असल्याने भावात वाढ झाली आहे. शेवग्याबरोबरच बीटच्या भावातही वाढ झाली आहे. थंडीच्या दिवसात रक्त वाढण्यासाठी सध्या बीटला मागणी आहे.
मात्र सध्या गुलटेकडी मार्केटयार्ड बाजारात बीट फळाची आवक कमी झाल्याने बीट भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात बीट २० ते ३५ रुपये किलो असून, किरकोळ बाजारात बीट ४० ते ५० रुपये प्रतवारीनुसार विक्री सुरू आहे. साधारण मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी १०० ते १५० गोणी आवक झाली आहे. दररोज किमान ३०० गोणी पिशवी बाराजात दाखल होते. मात्र, सध्या आवक कमी झाल्याने भावाच वाढ झाली आहे. बीटची आवक मध्यप्रदेशातील इंदोर व पुणे जिल्ह्यातून खामगाव, चाकण, धोंडकरवाडी, मंचर या भागांतून आवक होत आहे.